विश्वास ज्ञानप्रबोधिनी

विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट

Vishwas Dnyan Prabodhini विश्वासज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक ही सामाजिक संस्था दि. 31 मार्च 2000 रोजी सामाजिक व सहकार क्षेत्रातील विविध उद्दीष्टांच्या पूर्तीसाठी स्थापन झालेली आहे. ग्रामीण, आर्थिकदृष्टया मागास तसेच सामाजिकदृष्टया दुर्लक्षित व वंचित घटकांचा सर्वांगाने विकास साधण्यासाठी व त्यांना समाजाच्या मुख्यतः धारेत आणण्यासाठी संस्था कार्यरत आहे. यासाठी सहकारातून सामाजिक विकास हे संस्थेचे धोरण आहे. सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे श्री.विश्वास ठाकूर यांनी आपल्या सहकार्‍यांसह संस्थेची स्थापना केली आहे.

संशोधन व प्रशिक्षण हा समाज परिवर्तनाचा पाया आहे. अपेक्षित समाज परिवर्तनासाठी महत्वाच्या व गरजेच्या विषयावर योग्य वेळेत संशोधन झाले पाहिजे. तसेच या संशोधनाच्या आधारावर निश्‍चित कालावधीत प्रकल्प करुन ते पूर्ण केले पाहिजेत. जेणेकरून विकासाचे मुद्दे पडून न राहता मार्गी लागतात व समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला त्यामुळे खरा हातभार लागतो. याच विचाराने मुख्यत्वे सामाजिक व सहकार क्षेत्रातील विविध मुद्दे घेऊन विश्वासज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट काम करीत आहे. समाजातील मुख्य धारेतील घटकांसोबतच प्रामुख्याने दुर्लक्षित व वंचित घटकांचा सर्वांगाने विकास साधणे हे संस्थेचे मुख्य उद्दीष्ट आहे.

 

प्रबोधिनीमार्फत खालील उपक्रम राबविले जातात

‘रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ’ उपक्रम

प्रसार माध्यमांमध्ये समाज घडविण्याची ताकद आहे. यासाठी ही प्रसारमाध्यमे समुदायाच्या नियंत्रणात असली पाहिजे व त्याद्वारे समुदायाच्या मूलभूत प्रश्‍नांवर बोलले गेले पाहिजे. समुदाय विकास व त्याद्वारे सामाजिक विकास हे ध्येय समोर ठेवून ‘रेडिओ विश्वास90.8 कम्युनिटी रेडिओ’ कार्यरत आहे. समुदायाच्या विकासासंबंधी विविध कार्यक्रम निर्मिती व त्याचे प्रसारण तसेच या निर्मिती व प्रसारणामध्ये समुदायातील प्रतिनिधींचा मुख्य सहभाग ही समुदाय रेडिओची नाविन्यपूर्ण प्रक्रिया येथे कार्यरत आहे. रेडिओचे तंत्र शिकवून समुदायातील व्यक्तींचा आवाज बुलंद करण्याचा संस्था प्रयत्न करीत आहे.

‘नाशिक 2050’ उपक्रम

nashik-2050नाशिकचा बदल अत्यंत जलद गतीने होत असून मूलभूत सोयीसुविधा ते माहिती तंत्रज्ञानापर्यंतचा हा बदल आपण बघत व अनुभवत आलो आहोत. आज नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर विकसित होणार्‍या शहरांसोबत जोडले जात आहे. तेव्हा पुढील पन्नास वर्षांत नाशिकचा चेहरामोहरा बदललेला असेल यात कुठलीही शंका नाही. नाशिकचा हा जलदगतीने होणारा बदल शाश्‍वत व पर्यावरणपूरक असावा हा नेमका मुद्दा लक्षात घेऊन विश्वास को-ऑप लि. नाशिक, विश्वासज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने भविष्यातील नाशिक 2050 हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश नाशिकच्या विकासाची विस्तृत रुपरेषा तयार करणे व सदर रुपरेषा नाशिकच्या विकासात हातभार लावू इच्छिणार्‍या प्रत्येक घटकास उपलब्ध करून देणे हा आहे. सदर रुपरेषा तयार करताना नाशिकमधील जुन्या अनुभवसंपन्न व आधुनिक विचारसरणीने जगाकडे बघणार्‍या युवा पिढीचा सहभाग असावा यासाठी सदर उपक्रमामध्ये सहभागासाठी संस्थेने नाशिकमधील सर्व स्तरातील व्यावसायिक, निवृत्त व सध्या सेवेत असणार्‍या अधिकारी, कर्मचारी, वास्तुविशारद, विद्यार्थी, विविध विषयांवर काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था तसेच नाशिकच्या विकासात हातभार लावू इच्छिणार्‍या सर्वच मान्यवर व्यक्तींना आमंत्रित केले आहे.

अभ्यासिका

abhyashikaआजच्या व्यावसायिक शिक्षण पद्धतीमध्ये उत्तम दर्जाचे प्राथमिक शिक्षणसुद्धा दुरापास्त होत चाललेले आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृृष्ट्या मागास घटक शिक्षणापासून वंचित होत आहे. त्यातच लहान घरात शांतपणे अभ्यास करण्याची सोय नसल्याने अशा कुटुंबातील विद्यार्थी मागे राहत आहेत. अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये जिद्दीने शिक्षण घेत असलेल्या खास मागास व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका संस्था चालवित आहे. विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांद्वारे यश संपादन करून, इतर व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून समाजातील मुख्य धारेत आपले भक्कम स्थान निर्माण करावे हा अभ्यासिकेमागील संस्थेचा उद्देश आहे. अभ्यासिकेत अभ्यासासाठी शांत व पोषक वातावरण आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना आवश्यक ते ग्रंथ, नियतकालिके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर इंटरनेटद्वारा माहिती व संदर्भसेवेबरोबरच झेरॉक्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय । वाचनसंस्कृती वृद्धिंगत होणे ही काळाची गरज आहे. सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय हे एक सृजनाचे व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. तसेच वाचनाची व चिंतनाची निरंतर प्रक्रिया चालविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. विश्वासज्ञान प्रबोधिनीने ‘यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व वाचनालय’ या नावाने सुरू केलेल्या ग्रंथालयाचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. ग्रंथालयात कथा, कादंबरी, चरित्रे, कविता, नाटके, संदर्भ, बालवाड्मय, सहकार, बँकिंग, आरोग्य, शिक्षण, कायदा, अर्थशास्त्र, पत्रकारिता, विज्ञान, शेती, धार्मिक, व्यक्तिमत्व विकास यासह इतर विषयांवरील एकूण ग्रंथसंपदा 15,410 आहे. ग्रंथालयात नियमितपणे मराठी व इंग्रजी भाषेतील 8 वर्तमानपत्रे तसेच 30 नियतकालिके येत असतात.

ग्रंथ तुमच्या दारी-बाल विभाग

balvibhagग्रंथालयाने लहान मुलांमध्ये वाचनविषयक अभिरुची वाढविणे व व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी सकस, अभिजात पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहचावी याकरिता ‘ग्रंथ तुमच्या दारी-बाल विभाग’ योजना सुरू केली आहे. आजमितीस 100 पुस्तकांची एक पेटी ज्यामध्ये ज्ञान, मनोरंजन व विज्ञान असे व्हरायटी पुस्तके असलेल्या 75 ग्रंथपेट्यांद्वारे 7500 पुस्तके नाशिक, पुणे, अंधेरी, ठाणे, जुन्नर या शहरांबरोबरच आदिवासी विक्रमगड, त्रंबकेश्वर तालुक्यातील आश्रमशाळा, क्लासेस, हाऊसिंग सोसायट्या, ज्येष्ठ नागरिक मंडळ अशा विविध ठिकाणी मोफत वाचनासाठी उपलब्ध करून दिले आहेत.

संशोधन व प्रशिक्षण

sonsodhon-prashikshan संशोधन व प्रशिक्षण हा समाज विकासाचा पाया आहे. हा पाया अधिक भक्कम करण्यासाठी प्रगतीच्या दिशेने मूलभूत विषयांवर संशोधन करणे व त्याद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रम चालविणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. संशोधनाचे हे उद्दिष्ट प्रभावीपणे राबविण्यासाठी मानव संसाधन विकास हा संस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्याद्वारे व्यवस्थापन, संवाद, सहकार कौशल्ये व एकंदरीत जीवन कौशल्ये यावर संस्थेचा भर आहे. या संपूर्ण संशोधन व प्रशिक्षणाचा उपयोग व्यक्ती स्वता:, कार्यरत संस्था तसेच सर्व समाज अशा पद्धतीने विस्तारलेला आहे. यासाठी ज्ञान, कौशल्ये व दृष्टिकोन विकास ही त्रिसूत्री संशोधन व प्रशिक्षणाचा आधारस्तंभ आहे.

 
To know more visit us on www.vishwasdynanprabodhini.com