प्राप्त पुरस्कार

बँकेस प्राप्त झालेले पुरस्कार

  • जिल्हास्तरीय – १८
  • राज्यस्तरीय – १७
  • राष्ट्रस्तरीय – ०३
  • एकूण – ३८

समाजाच्या सर्व घटकांसाठी समर्पण भावनेने केलेल्या कामाची पावती तर मिळणारच. अशा त्या कामांचा गौरव तर होणारच. हा गौरव वैयक्तिक आणि सांघिक स्वरूपात झाला आहे.

सामाजिक, आर्थिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार असो वा अन्य कोणतेही क्षेत्र, त्यातील समस्या कितीही मोठी असली तरी त्यासाठी हवी गतिशील आणि समर्पित कार्यकर्त्यांची फळी. अशा सक्षम नेतृत्वाचा गौरव श्री. विश्वास ठाकूर यांच्या रूपानं होतो आहे.

विश्वास ठाकूर यांची उद्योजकता व सृजनशीलता रेल्वे रुळांप्रमाणे समांतर अन् एकालयीत चालतात. विशेष म्हणजे त्याला त्यांनी सामाजिकता व राष्ट्रीयतेची जोड दिली आहे. येणारा प्रत्येक दिवस नित्य नवा मानून ते काम करतात. सहकार क्षेत्रात आपल्या प्रत्येक लहानमोठ्या कृतीतून बँक कशी चालवावी याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. सहकारी बँका तळागाळातील, मध्यमवर्गीय, गरजू उद्योजकांना आपल्या वाटल्या पाहिजेत, त्यांच्या विश्वसनीयतेला तडा जाता कामा नये, हाच त्यांचा हेतू व अट्टाहास असतो. बोलण्यातील स्पष्टता, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू. अर्थात त्याचा त्यांना जसा फायदा झाला तसा तोटाही सहन करावा लागला. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच व्यवसायातही पारदर्शकता आली. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी बँकेची स्थापना करून सहकार क्षेत्रात तरुण संस्थापक अध्यक्ष होण्याचा बहुमानही त्यांनी प्राप्त केला. एखाद्या ध्येयवेड्या माणसाने ध्यास घेतला म्हणजे किती मोठे आणि इतरांना अविश्वसनीय वाटावे असे काम उभे राहू शकते, याचा आदर्शच त्यांनी उभा केला आहे. कोणतेही क्षेत्र असो, त्यात ते रमतात. आनंद मिळवतात कारण तो त्यांचा अंगभूत गुणधर्म आहे. क्षेत्र भिन्न असले तरी त्याचे सूत्र शोधून त्यांना एकमेकांत गुंफत जाणे आणि त्याचा सुंदरसा हार तयार करण्याचे कसब त्यांनी मिळवलेले आहे.

अन्यथा सहकार क्षेत्राचे साहित्याशी, साहित्याचे क्रीडेशी आणि समाजकार्याचे चित्रकारितेशी नाते जोडणे आणि ते सातत्याने वृद्धिंगत करणे वाटते तितके सोपे काम नाही; पण त्यांनी ते सहजी केल्याचे दिसून येते. माणूस बोलण्यातून ओळखला जाण्यापेक्षा कामातून ओळखला जावा हे त्यांचे म्हणणे त्यांनी प्रथमतः स्वतःच्या कृतीत पुरेपूर उतरवलेले आहे. ‘आधी केले मग सांगितले’, ‘बोले तैसा चाले…’ या सर्व उपमा ते जगत आहेत आणि यात अतिशयोक्ती अजिबात नाही. आज विश्वास को-ऑप.बँकेने भारतीय पातळीवर सहकार क्षेत्रात आदर्श व आधुनिक बँकिंग व्यवस्थापन प्रणालीत महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे, ते त्यामुळेच. एकविसाव्या शतकातील जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणाच्या गतिमान प्रक्रियेुळे निर्माण झालेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करून विकास घडवण्यासाठी सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे.

सहकारातील शिस्त आणि विचारधारेची बांधिलकी मानून काम करणारा, अत्यंत व्यापक, विधायक आणि सकारात्मक विचार करून आपल्यावर सोपवलेली जनकल्याणाची जबाबदारी पार पाडणार्‍या मोजक्याच सहकार नेतृत्वांत त्यांचा नामोल्लेख निःसंकोचपणे केला जातो. आज विश्वास ठाकूर हे नाव सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, साहित्य, सहकार-बँकिंग यातील चाळीसहून अधिक संस्थांशी निगडित आहे. अशा विविध क्षेत्रांकडे ते का वळले असावेत; असा विचार करता उद्योजकतेच्या पलीकडे जाऊन काही दिले पाहिजे ही त्यांच्यातील पत्रकारितेची ऊर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हती, हेच उत्तर आहे. याचे प्रतिबिंब त्यांनी केलेल्या कामातूनच पाहायला मिळते.