शोध स्वतःचा

नकारातून आव्हान स्वीकारले

पुण्यात एम.ए. व पत्रकारितेचा कोर्स केल्यावर त्यांनी नाशिकमध्ये प्रिंटिंग प्रेस, महानंदा दूध वितरण, मंदार कम्युनिकेशन असे स्वयंउद्योग सुरू केले. कारण नोकरी करण्याची आपली मानसिकता नाही, हे त्यांनी ओळखले होते. स्वत:ला ओळखणे ही यशोशिखराची पहिली पायरी असते. राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज घेतले. ते फेडूनही झाले, पण नवे काही करण्यासाठी खेळते भांडवल हवे, हे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी एका नामवंत सहकारी बँकेकडे अर्ज केला. पण दुर्दैवाने, केवळ आकसाने तो अर्ज फेटाळण्यात आला.

त्यावेळी सहकारी बँका कशा असाव्यात, कशा चालवाव्यात हे मी तुम्हांला दाखवतो’ अशा स्पष्ट शब्दांत श्री. ठाकूर यांनी संचालकांना खडे बोल सुनावले. एक नवे आव्हान स्वीकारले. दृढनिश्‍चयाने, आत्मविश्वासाने त्यांनी आपले तरुण सहकारी एकत्र केले. काही रक्कम भागभांडवल म्हणून गोळा केली आणि बँक स्थापनेचा संकल्प सोडला. ही पंचविशीतील पोरं काय बँक चालविणार?’ अशी टीकाकारांची थट्टेखोर भाषा जेव्हा त्यांच्या कानी आली तेव्हा त्यांनी ठणकावून सांगितले, जर राजीव गांधी वयाच्या चाळीशीत देश चालवू शकतात, तर आम्ही पंचविशीतले तरुण एक सहकारी बँक का चालवू शकणार नाही…’’ या उद्गारात अतिशयोक्ती नव्हती, तुलना नव्हती. होता तो फक्त आत्मविश्वास. त्यावेळी रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांनाही या धाडसाचे अतिशय कौतुक वाटले. 25 मार्च 1997 रोजी विश्वास को-ऑप.बँकेची स्थापना झाली अन विश्वास ठाकूर यांच्या आयुष्यातील एक नवे सहकार पर्व सुरू झाले. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे 27 वर्षे. हळूहळू बँकेच्या शाखा वाढत गेल्या. नाशिककरांच्या मनात या बँकेने एक विश्वास निर्माण केला.

केवळ नजर आहे म्हणून आम्ही फक्त चालत राहत नाही तर आत्मविश्वासाने चालतो, पुढे जातो, हा त्यांचा बाणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा ठरला. किंबहुना त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवलं, काम उभं केलं, ते पाहता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं संपूर्ण सारच हे तत्त्व सांगतं. सामाजिक कार्य आणि स्वत:चा शोध घेतानाच समाजासाठी आणि तळागाळातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी काम करण्याच्या जाणिवेतून त्यांनी विश्वास को-ऑप.बँकेची स्थापना केली आणि विश्वास ठाकूर हे नाव भारतीय पातळीवर पोहोचले.