असा मी

Vishwas Thakur Aai Baba

प्रेरणास्थान

लीलावती जयदेव ठाकूर/जयदेव किसन ठाकूर

वडील जयदेव किसन ठाकूर यांनी प्रतिकूल परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले आणि पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळवली. तेथे प्रामाणिकपणे त्यांनी सेवा केली व सामाजिक जाणिवेतून अनेक उपक्रम राबविले. त्याचबरोबर मुले राजेंद्र, धनंजय, विश्वास, संध्या यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण दिले. सर्वजण विविध क्षेत्रात आपले कर्तुत्त्व सिद्ध करत आहेत. पत्नी लीलावती यांनी त्यांना मोलाची व खंबीर साथ देऊन आदर्श कुटुंबासाठी योगदान दिले.

Vishwas Thakur समाजातील विविध घटकांना उन्नतीच्या दिशेने घेऊन जायचे असेल. तर त्यांच्या मानसिक, बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा आर्थिक विकास घडवून आणणे महत्त्वाचे आहे,हा विचार हेच आपले ध्येय मानून झालेल्या आणि चाललेल्या मार्गक्रमणाचे नाव विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक हे आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांच्यावरील विश्वासामुळे आणि त्यांच्या दुर्दम्य आत्मविश्वासामुळे अकरा शाखांमध्ये विस्तारीत झालेली बँक नाशिकचे सहकार क्षेत्रातील वैभव आहे. मूल्यांची जोपासना अखंड ग्राहकहित आणि नव तंत्रप्रणाली या त्रिसूत्रीच्या जोरावरच बँकेची लक्षवेधी प्रगती झाली आहे.

अगदी सर्वसामान्य माणसालाही बँकेच्या विविध योजनांमध्ये भाग घेता यावा यासाठी योजनांमधील कल्पकता दाखविण्यात अध्यक्ष विश्वास ठाकूर यशस्वी झालेले दिसतात. त्याचाच परिणाम म्हणून स्वयंसहाय्यता बचत गट, आदिवासी बांधव आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोठा आर्थिक दिलासा आणि आधार देण्यात विश्वास को-ऑप. बँकेने बजावलेली भूमिका अनन्य साधारण ठरली आहे. एखाद्या बँकेने दाखविलेले आणि जोपासलेले हे सामाजिक भान एकूणच सहकार क्षेत्रात विरळ म्हणावे लागेल. लोकमानसाला सांभाळण्यात अध्यक्ष विश्वास ठाकूर यांना आलेल्या या यशाचे श्रेय त्यांच्या निश्चित दृष्टिकोन, ठाम निर्णय व शिस्तबद्धतेला जाते. त्यांच्या या गुणसमुच्चयामुळेच वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ते बँकेचे संस्थापक अध्यक्ष झालेत. विकासाच्या आकाशाला गवसणी घालण्याच्या त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यांमुळेच कमी वयातील संस्थापक अध्यक्षपदाच्या विक्रमाची नोंदही त्यांच्या नावावर आहे.

‘समस्या सोडविण्यातून ऊर्जाप्राप्त’ असा अत्यंत असाधारण आणि म्हणूनच अनोखा गुण विश्वास ठाकूर यांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याने यापुढेही असंख्य विक्रमी मोठी कामे त्यांच्या हातून होण्याची आशा जनसामान्यांत बोलली जाते. त्यादृष्टिने काही प्रकल्पांची आखणी आणि प्रारंभही त्यांनी केलेला दिसतो. या सर्व सहकार व सामाजिक क्षेत्रातील कामाबरोबरच सांस्कृतिक, कला, शिक्षण आणि क्रीडा प्रांतातील त्यांची मुशाफिरी विश्वास ठाकूर या व्यक्तिमत्त्वातील गुणांना अधोरेखित करणारी आहे. दुसरा उल्लेखनीय भाग म्हणजे त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीला वाचन, मनन, चिंतनाचे अधिष्ठान आहे. त्यामुळेच एकदा घेतलेला निर्णय आजवर अचूक लक्ष्यवेध साधत आला आहे. त्यांच्याकडे असणारी पत्रकारितेतील पदवी. सामाजिक उत्कर्षासाठी कशी वापरता येईल याचे ते सातत्याने मंथन करीत असतात. त्यामुळेच आजपर्यंतच्या त्यांच्या सर्व कामांबाबत त्यांना प्रसिद्धी माध्यमांनी केलेले सहकार्य त्यांच्यातील विकासासाठी उपयुक्त ठरणार्‍या ‘मिडिया पर्सन’ला उंच नेणारे ठरले आहे.

आजपर्यंत अनेक स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी विश्वास ठाकूर यांना गौरविण्यात आले आहे. सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी शासकीय, अशासकीय संस्थांच्याद्वारे त्याला कशी मदत मिळवून देता येईल, याचा ते साकल्याने विचार करीत असतात. त्यामुळेच चाळीसहून अधिक स्थानिक, राज्य सरकारी तथा केंद्र सरकारच्या अनेक समित्यांवर ते कार्यरत होते व आहेत. त्यांच्यातील या सौहार्दामुळेच जनसामान्यांचा त्यांच्यावर ‘सार्थ विश्वास’ आहे.

www.knowyourtown.co.in वेबसाईट मध्ये आलेली मुलाखत… new